‘एपीएससी’विरोधात परीक्षार्थींचा आक्रोश

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
protest by candidates in chhatrapati sambhajinagar raises questions on mpsc transparency
‘आम्ही रात्रंदिवस झिजायचं.. तुम्ही पेपर फोडून विकायचं..’, ‘ड्रग इन्स्पेक्टर पेपर २० मार्चला समाजमाध्यमावर, २२ मार्चला वर्गात!’, हा कसला पारदर्शक कारभार संतप्त सवाल करीत, हजारो परीक्षार्थी मंगळवारी छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर उतरले. आयोगाच्या कारभाराबाबत प्रचंड संताप व्यक्त करून, क्रांती चौक त्यांनी दणाणून सोडला. ‘एमपीएससी’च्या विविध परीक्षांमधील पेपरफुटी, कथित गैरप्रकारांबाबत उल्लेख करणारे विविध परीक्षां संदर्भातील पोस्टर हाती घेत विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कारभाराबाबत आक्रोश व्यक्त केला.

‘एमपीएससी’ आयोगाच्या कारभारावरून विद्यार्थ्यांची संतापाची धग आता राज्यभरातील विविध भागांत दिसून येत आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शेकडो परीक्षार्थी सकाळपासून क्रांती चौकात जमा होत होते. क्रांती चौकात औरंगपुरा, निराला बाजार, टीव्ही सेंटर, नागेश्वरवाडी अशा विविध भागांतून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण एकत्र येत होते. सर्वसामान्य, शेतकरी कुटुंबातील मुले वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षा देतात; त्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कोणाला नाही, असे सांगून विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कारभावर नाराजी व्यक्त केली.
परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. आयोगाच्या विविध परीक्षांमधील गैरप्रकार, निकालातील विसंगती, परीक्षा प्रक्रियेबाबत संशयामुळे नाराजी असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पेपरफुटीसारख्या प्रकरणांची पारदर्शक पद्धतीने चौकशी करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘आमच्या येथे पेपर मिळेल ते पण पार्किंगमध्येच..’, ‘एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर घोटाळा’, ‘कॉमर्सचे कॅडर वेगळे करून कॉमर्सला न्याय द्या..’, ‘एमपीएससी ऑफिसमधून लीक?, तीन अधिकारी अटकेत’, ‘स्टेनो वाचवा’ अशा आशयांचे फलकाद्वारेही आंदोलक विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. आंदोलनानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यामध्ये विविध मागण्या मांडण्यात आल्या.