Public Outcry Over Agricultural Issues Farmers Protest For Bonus And Loan Waiver
शेतीप्रश्नांवरून जनआक्रोश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
धानाला बोनस, २४ तास वीजपुरवठा, सरसकट कर्जमाफी , आणि नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी तिरोडा आणि अर्जुनी मोरगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.
तिरोडा येथे जुनी नगर परिषद ते तहसील कार्यालयादरम्यान मोर्चा काढण्यात आला. यानंतर झालेल्या सभेत आमदार पवार यांनी राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीका केली. राज्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटात आहे. सरकारने धानाला जाहीर केलेला २,३९० रुपये दर तोकडा आहे. १०० टक्के धान खरेदी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा हिस्सा बाजारात कमी दराने विकावा लागला. निवडणुकीपूर्वी एकरी २५ हजार रुपये बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अधिवेशनात २० हजार रुपयांची घोषणा झाली; मात्र सहा महिने उलटूनही शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.या मोर्चात माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आमदार चरण वाघमारे, माजी आमदार सुनील भुसारा, युवा नेते सलील देशमुख, पंकज नाना बोराडे, रविकांत वरपे, जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे, प्रहारचे महेंद्र भांडारकर, मेघा बिसेन, कैलास पटले, वनिता ठाकरे, अतुल गण्यापवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.