Shami And Mukesh Kumars Incisive Bowling Leads East Zone To Record Performance
शमी, मुकेशकुमारमुळे वर्चस्व
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
संक्षिप्त धावफलक
महंमद शमी आणि मुकेशकुमारच्या भेदक माऱ्याच्या जोरावर पूर्व विभागाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण विभागाची तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद २४२ अशी स्थिती केली होती.चेपॉकच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये ही लढत सुरू आहे. पूर्व विभागाने पहिल्या डावात ७०८ धावा केल्या आहेत. पाटा खेळपट्टी असल्याने दक्षिण विभागही मोठी धावसंख्या रचेल, असे वाटले होते. मात्र, शमी आणि मुकेशने अचूक मारा करून दक्षिण विभागाच्या फलंदाजांना संधीच दिली नाही. त्यामुळे दक्षिण विभाग अजूनही ४६६ धावांनी पिछाडीवर आहे. पाटा खेळपट्ट्यांवर अनुभव कसा मोलाचा ठरतो, हे शमी आणि मुकेशने दाखवून दिले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्मा १३३ चेंडूंत पाच चौकारांसह ५६ धावांवर खेळत आहे. दक्षिणेकडून तिलकव्यतिरिक्त केवळ देवदत्त पडिक्कललाच अर्धशतक ठोकता आले.
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज शमीने तीन ‘स्पेल’मध्ये गोलंदाजी केली. पहिल्या ‘स्पेल’मध्ये त्याने तीन षटके टाकली. त्यातील दोन षटके निर्धाव होती. त्याच्या तीन षटकांत दक्षिण विभागाचे फलंदाज एकही धाव घेऊ शकले नाही. यानंतरचा त्याचा ‘स्पेल’ चार षटकांचा होता. यात त्याने दहा धावांत शेख रशीदला बाद केले. तिसऱ्या ‘स्पेल’मध्ये शमीने आणखी चार षटके टाकली. यात त्याने रविचंद्रन स्मरणला बाद केले. त्याने एकूण ११ षटकांतील चार षटके निर्धाव टाकली आणि १७ धावांत दोन विकेट मिळवल्या. चेन्नईतील दमट हवामानामुळे जास्त दमछाक होऊ नये, म्हणून गोलंदाजांनी छोटे ‘स्पेल’ टाकले, जे प्रभावी ठरले. खरे तर दोन विकेट ही मोठी कामगिरी नसली, तरी या पाटा खेळपट्टीवर त्याने हुशारीने केलेला मारा प्रभावी ठरला; कारण याच खेळपट्टीवर पहिल्या दोन दिवसांत दक्षिण विभागाचे गोलंदाज विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करीत होते. दक्षिण विभागाच्या महंमद सिराजला २५ षटके मारा करून विकेट मिळाली नव्हती.
शमीने फलंदाजांना फटके मारण्यासाठी अजिबात जागा दिली नाही. शेख रशीद आणि देवदत्त पडिक्कल ही जोडी शमीने आपल्या ‘इनस्विंग’ चेंडूने फोडली. याच्या २० षटकांनंतर, ईशान किशनच्या अनुपस्थितीत काही काळ कर्णधारपद भूषवणाऱ्या वैभव सूर्यवंशीने ३६ वर्षीय शमीला पुन्हा गोलंदाजीला आणले आणि त्याने लगेचच प्रभाव पाडला. त्याने स्मरणला माघारी पाठवले. दक्षिण विभागाला दुपारच्या सत्रात तीन विकेट गमावून फक्त ६१ धावा करता आल्या. उपाहाराला दक्षिण विभागाची २ बाद ११५ अशी, तर चहापानाला ५ बाद १७६ अशी स्थिती होती.
शमीला मुकेशकुमारचीही चांगली साथ मिळाली. भारताकडून तीन कसोटी सामने खेळलेल्या ३२ वर्षीय मुकेशने रिकी भुई आणि देवदत्त पडिक्कल यांना बाद केले. पडिक्कलने एन. जगदीशनसह ६०, तर रशीदसह ५६ धावांची भागीदारी रचून डाव सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्याला अर्धशतकाचे शतकात रूपांतर करता आले नाही. यानंतर तिलक वर्माने एक बाजू लावून धरली. त्याने स्मरणसह ४५, तर श्रेयस गोपालसह १५५ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी रचली. तिलकचे हे स्पर्धेतील सलग तिसरे अर्धशतक ठरले. दिवसाच्या अखेरच्या षटकात कुनैन कुरेशीने श्रेयसला स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद करून पूर्व विभागाला मोठे यश मिळवून दिले. आता तिलक वर्मा कितपत किल्ला लढवतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. दक्षिण विभागासमोर अजूनही ‘फॉलोऑन’ टाळण्याचे मोठे आव्हान कायम आहे.
संक्षिप्त धावफलक
पूर्व विभाग - पहिला डाव - सर्व बाद ७०८ वि. दक्षिण विभाग - पहिला डाव - ८० षटकांत ६ बाद २४२ (रिकी भुई १, नारायण जगदीशन (४२ चेंडू, सहा चौकार) ३२, देवदत्त पडिक्कल ६२ (१०४ चेंडू, ४ चौकार), शेख रशीद २७ (४८ चेंडू, ५ चौकार), तिलक वर्मा खेळत आहे ५६ (१३३ चेंडू, ५ चौकार), रविचंद्रन स्मरण २३ (५५ चेंडू, १ चौकार), श्रेयस गोपाल २६ (७९ चेंडू, १ चौकार), चामा मिलिंद खेळत आहे २, महंमद शमी ११-४-१७-२, मुकेशकुमार १२-१-३६-२, महंमद कुनैन कुरेशी ३१-७-७७-१, शिखर मोहन १३-०-५२-१).