छत्रपती संभाजीनगर : एखाद्या दुर्घटनेचा परिणाम हा खूप खोलवर असतो. क्षणात एक गोष्ट घडते आणि त्याचे थेट परिणाम मुलांवर होतात. बंदीवानांच्या मुलांनाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशाच एका बंदिवान महिलेच्या तीन मुलांसाठी महिला बालविकास यंत्रणा पुढे आली.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्डलाइन १०९८ यांच्या प्रयत्नातून तीन सख्खी भावंडे शहरातील दत्तकविधान संस्थेत दाखल झाली असून ती बाल भिक्षेकरी होण्यापासून वाचली. सामाजिक विषयांचा थेट परिणाम लहान मुलांवर होतो. या विषयांची उकल करताना अनेकदा यंत्रणाही चक्रावून जात असली तरी यंत्रणांना प्रयत्न करावेच लागतात. पतीच्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या एका महिला बंदिवानाची तिन्ही मुले त्यांच्या आजीसोबत भीक मागत असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्डलाइनला समजली. दोन्ही यंत्रणांनी या मुलांचा शोध घेतला तेव्हा मिळालेली माहिती बरोबर निघाली. ही मुले त्यांच्या आईच्या आईकडे असली तरी रस्त्यावर उभे राहून भीक मागताना दिसली. यातला मोठा मुलगा साडेचार वर्षांचा, मधला साडेतीन वर्षांचा आणि लहान मुलगा अडीच वर्षांचा आहे. वडिलांचा खून झाला तेव्हा त्यांची आई पुन्हा गरोदर होती. त्या घटनेनंतर या मुलांना सांभाळणारे कुणीच नव्हते. त्यांची आई तुरुंगात आहे आणि नातेवाईकांनी मुलांना सांभाळण्यासाठी नकार दिला. मुले आजीसोबत असली तरी तिचीही परिस्थिती चांगली नसल्याने या मुलांना भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता. बाहेरच्या वातावरणाचा परिणाम मुलांच्या तब्येतीवरही झाला होता. मधल्या मुलाच्या डोळ्याला इन्फेक्शन झाले होते. बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड लाइनने आजीची समजूत काढली आणि मुलांना तिथून बाहेर काढले. तिन्ही भावंडे सहा वर्षांच्या आतली असल्याने सध्या या मुलांना शहरातील दत्तकविधान संस्थेत ठेवण्यात आले आहे. मुलांची प्रकृती चांगली असून ती आता संस्थेत रूळली असल्याचे संस्थेने ‘मटा’ला सांगितले.