भीषण अपघातात सहा मजूर ठार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
tragic accident claims lives of six laborers horrific crash on gondia balaghat road
गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात सोमवारी मध्यरात्री तेलंगणमध्ये मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअपला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात तीन वर्षांच्या बालिकेसह सहा मजूर जागीच ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी झाले.

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर परिसरातील रहिवासी असलेले हे मजूर एमपी-१५ टी ३४९५ या पिकअपने तेलंगणमधील करीनगरच्या जगतियाल येथे निघाले होते. नागरा गावाजवळ येताच गोंदियाकडून येणाऱ्या ट्रकने (एमएच ३५ एजे २५४७) जोरदार धडक दिली. यात आरुष मात्रे (वय ३, रा. सावरी), किरण संतोष वैद्य (वय २६, रा. लोडाना), संतोष मात्रे (वय ३८), सुशिला मात्रे (वय ३५, दोघेही रा. किन्ही), रूपसेन सत्यकर (वय ३५) आणि ज्योती सत्यकर (वय ३२) या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
भुमेश्वर मात्रे (वय ४७), संगीता मात्रे (वय ३५), राजेंद्र पंचाले (वय ३०), लक्ष्मी पंचाले (वय २७), संतोष वैद्दे (वय ३५), राकेश बाहे (वय २४) आणि चालक संदीप बाहे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातावेळी वाहनांच्या धडकेचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

बालाघाट जिल्ह्यातील सावरी खुर्द येथील भुमेश्वर दुलिचंद मात्रे हे मिस्त्री काम करतात. दर वर्षी रोजगारासाठी तेलंगणात जातात. सोमवारी पत्नी सुशीला आणि तीन वर्षांचा मुलगा आरुषसह ते तेलंगणला जाण्यासाठी निघाले. मात्र, पिकअपला अपघात झाल्याने भुमेश्वर यांनी पत्नी आणि मुलाला गमावले आणि या हसऱ्या कुटुंबात क्षणात दु:ख पसरले.