गोंदिया : घरातील कूलरमध्ये पाणी भरताना अचानक करंट उतरल्याने मामा आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा येथे घडली. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
भाग्यवान हरिचंद बावणे आणि त्यांची भाची सुप्रिया सुरेश सोनटक्के हे दोघे दुपारी घरातील कूलरमध्ये पाणी भरण्याचे काम करीत होते. अचानक कूलरच्या लोखंडी बॉडीमध्ये करंट उतरला. पाण्यामुळे विजेचा प्रवाह वेगाने पसरला आणि दोघांनाही विजेचा तीव्र झटका बसला. दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. ऐन सणासुदीच्या व कौटुंबिक वातावरणात मामा-भाचीचा मृत्यू झाल्याने गुमाधावडा गावासह संपूर्ण तिरोडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.